न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली; कुलस्वामी क्रेडिट सोसायटीच्या वसुलीवर गंभीर आरोप
स्थगिती आदेश असतानाही जप्तीची कारवाई केल्याचा दावा; महसूल व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीची तयारी!
पुणे : वृत्तसेवा
न्यायालयाचा स्पष्ट मनाई आदेश आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वसुली पथकाने बेकायदेशीररीत्या जप्तीची कारवाई केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिरूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, दोन मंडलाधिकारी, दोन तलाठी आणि चार पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. या प्रकरणामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन आणि महसूल यंत्रणेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
संबंधित प्रकरणात न्यायालयाने मनाई हुकूम (Injunction Order) दिलेला असतानाही तसेच जप्ती आणि ताबा कारवाई न करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश असल्याचा दावा करण्यात येत असतानाही वसुली पथकाने कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तडजोडीसाठी विनंती करूनही कारवाईचा आरोप
ताबा कारवाईपूर्वी दोन वेळा विनंती अर्ज देण्यात आले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सेटलमेंटसाठी अर्जही सादर करण्यात आला होता. मात्र, संबंधितांना पैसे नको असून लिलावच करायचा आहे, अशी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वसुली अधिकाऱ्यांनी आपण कायदा मानत नसल्याचे सांगितल्याचाही दावा तक्रारदारांनी केला आहे. घरात एक महिला एकटी असताना तिच्याशी अवाच्य भाषेत बोलण्यात आले. तसेच दोन लहान मुलांना दम देऊन एका जागेवर बसविण्यात आले आणि त्यांचे जबरदस्तीने फोटो काढून अपमानित करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर निर्णय घेण्याची सूचना
या प्रकरणात तहसीलदारांनी दोन वेळा न्यायालयीन प्रक्रिया पाहून निर्णय घेण्याची सूचना दिली होती, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. तरीही प्रत्यक्षात कारवाई झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी
या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक तसेच संबंधित मंत्री आणि शासनाच्या वरिष्ठ स्तरावर तक्रार नोंदविण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती पुणे शहर अध्यक्ष संजय मूलभारती यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे
Related Stories
Trending Now
Subscribe To Our Newsletter
[mc4wp_form id=671]
