
पुणे: पुरंदर तालुक्यातील शुक्लवाडी विकास सोसायटीने, वाल्हे मंडलाधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने बनावट फेरफार बनवून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर चक्क 15 लाख रुपयांचा बोझा चढवला आहे. यासंदर्भात वाल्हे पोलिस स्टेशनमध्ये व जिल्हा पोलिस अधीक्षक, ग्रामीण पोलीस इथे तक्रार केली असता, पोलिसांनी विकास सोसायटीच्या वतीने चुकीचे स्पष्टीकरण देऊन शेतकऱ्याच्या तक्रारीला धुडकावून लावले आहे.
वाल्हे येथील ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी शुक्लवाडी विकास सोसायटी कडून कोणतेही कर्ज घेतले नसताना, त्यांच्या सातबाऱ्यावर 15 लाख रुपयांचा बोझा टाकण्यासाठी बनावट फेरफार बनवला आणि मंडलाधिकारी व तलाठी यांनी संगनमताने सातबाऱ्यावर त्याची नोंद केली अशी तक्रार मुंडलिक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्हे येथील शेतकरी चंदन कृष्णा पवार व मारुती कृष्णा पवार यांनी शुक्लवाडी विकास संस्थेकडून 10 वर्षांपूर्वी पिक कर्ज घेतले होते, त्यावर शेतकरी कर्जमाफी साठी दोघांनी अर्ज केला होता, मात्र कर्जमाफी नाही मिळाली, विकास सोसायटीच्या वसुली पथकाने तगादा लावल्यानंतर या शेतकऱ्यांनी दागदागिने विकून, सावकाराकडून उधार पैसे घेऊन कर्जाची परतफेड करण्यास गेले असता, शुक्लवाडी विकास सोसायटी चेअरमन यांनी पैसे घेण्यास नकार देऊन तुमची जमीन आम्हाला देऊन टाका अशी मागणी केली. त्यास नकार देऊन शेतकऱ्यांनी थेट तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना तक्रार केली. त्यावर कर्जाची रक्कम भरून घेण्यास सोसायटी तयार झाली, मात्र अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोसायटीने कर्ज भरून घेण्याऐवजी,जमीन ताब्यात घेण्यासाठी तगादा लावला.
दरम्यानच्या काळात, ज्या जमिनीवर कर्ज आहे ती वगळून इतर जमीन दोन्ही शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर मुंडलिक यांना 10 वर्षांपूर्वी विकली होती, त्यावर कोणताही बोझा नव्हता. मात्र केवळ पवार बंधू यांच्यावर कर्ज फेडून न घेता, जमीन देण्याचा दबाव टाकण्यासाठी, शुक्लवाडी विकास सोसायटीने शेजारील मुंडलिक यांच्या जमिनीवर बनावट फेरफार बनवून बोझा चढवला. याची कल्पना मुंडलिक यांना दिली गेली नाही.
यासंदर्भात माहिती समजताच त्यांनी वाल्हे मंडलाधिकारी व वाल्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सोसायटीची बाजू घेऊन तक्रारदार मुंडलिक यांनाच उलट नोटीस बजावली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा मुंडलिक यांनी व्यक्त केली आहे.
