
पुणे: धायरीजवळील नांदोशी गावातील बेकायदेशीर खाणीबाबत तक्रारींवर कडक कारवाई करत जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी सखोल तपासणी अहवाल येईपर्यंत या खाणी पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिले असताना, तीन 2 दिवसातच शनिवारी दुपारी साडेबारा वाजता या खाणीमध्ये सुरुंग फोडून बेकायदेशीर उत्खनन सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थ व परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला धुडकावून मुजोर खाण मालकांनी उत्खनन सुरू करून त्वरित गौण खनिज वाहतूक देखील बिनदिक्कतपणे सुरू केली आहे. याचा अर्थ मुजोर खाण मालक यांच्यावर जिल्हाधिकारी व प्रशासनाचा कोणताही अंकुश उरला नाही.
नांदोशी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी हवेली प्रांत, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी तसेच पीएमारडीए, महापालिका, वन विभाग अधिकाऱ्यांनी गेल्या गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन नांदोशी खाणींचे सर्वेक्षण केले, आणि सखोल तपासणी अहवाल येईपर्यंत या खाणी बंद ठेवण्याचे आदेश दिले.
मात्र जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने न घेता, राजकीय वरदहस्त असल्याने खाण मालकांनी लगेच सुरुंग लावून डोंगरफोड व मालवाहतूक सुरू केली, ही गोष्ट पुणे जिल्हधिकाऱ्यांना अशोभनीय आहे. प्रशासनाचा अंकुश उरला नाही ही गोष्ट यातून स्पष्ट होते. याबद्दल ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त करून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
