

पुणे: शहराच्या पर्यावरणावर अत्यन्त गंभीर परिणाम करणाऱ्या नांदोशी येथील बेकायदेशीर खाणी अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
याबाबत महामीडिया वॉच न्यूजने 2022 पासून प्रसिध्द केलेल्या बातम्या, बेकायदेशीर उत्खनन याचे शूटिंग करून महसूल विभागाच्या विविध अधिकाऱ्यांच्या समोर मांडले. तसेच किरकटवाडी माजी उपसरपंच हरिष मंडले, त्यांचे सहकारी, शेकडो ग्रामस्थ यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकारी, तहसीलदार व इतरांकडे तक्रार अर्ज करून कारवाईची मागणी केली.
त्यानंतर सतत घेतलेल्या पाठपुराव्यामुळे काल प्रांत यशवंत माने यांनी तहसीलदार अर्चना निकम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडलाधिकारी पवार, तलाठी कानवते, महापालिका, पीएमारडीए, वन विभाग व इतर अधिकाऱ्यांच्या समवेत धडक कारवाई करत नांदोशी येथील या वादग्रस्त खाणींची सखोल पाहणी करून सर्व खाणी सील करण्याचे आदेश दिले. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, हवेली प्रांत यशवंत माने यांचे नांदोशी, किरकटवादी ग्रामस्थांनी शतशः आभार मानले.
या बेकायदेशीर खाणीमध्ये गेली अनेक वर्षे वनीकरण जागेत , बेसुमार गौण खनिज उत्खनन सुरू होते. मुळातच मुंबई बेंगळुरू एक्सप्रेस हायवे पासून 900 मीटर अंतरात डोंगर खाणी उत्खनन करण्यास परवानगी नव्हती, त्यात तो वनीकरण झोन, तसेच महसूल अधिकारी, राजकिय नेते व खाण चालवणारे यांच्यातील संगनमताने या खाणी अव्याहतपणे सुरू राहिल्या. त्यातून किती गौण खनिज उत्खनन होते , किती तास करायचे, याची मर्यादा ओलांडून केवळ कागदोपत्री कमी उत्खनन दाखवून 24 तास जेसीबी, सुरुंग लावून डोंगर फोडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे याभागातील जिणे मुश्किल झाले होते.
अत्यन्त महत्वाची बाब म्हणजे या खाणी चालवणारे हे राजकीय नेत्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे महसूल प्रशासन इतकी वर्षे राजकीय दबावाखाली मूग गिळून गप्प होते. मात्र ग्रामस्थ, माजी उपसरपंच हरीश मंडले, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला कारवाई करावी लागली. हे लोकचळवळ, माहिती अधिकार, नागरी हक्क चळवळीचे यश म्हणावे लागेल.
