
पुणे: महानगरपालिका हद्दीतील धायरी जवळील नांदोशी या गावामधील डोंगरभागात खानपट्टा मंजूर करताना सामायिक जमिनीतील शेतकऱ्यांची परवानगी न घेता केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर बेकायदेशीर खाणपट्टा मंजूर करण्याचा महाप्रताप जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील व हवेली तहसीलदार अर्चना निकम यांनी केल्याचे उघडकीस आले आहे.
यासंदर्भात नांदोशी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हवेली तालुक्यातील मौजे नांदोशी या गावामधील गट नंबर 4 मधील जागेत सहा सामायिक जमीन धारक आहेत, त्यांना कोणतीही कल्पना न देता, परवानगी न घेता श्री. बापू मारुती किवळे यांनी दुसऱ्याच्या नावाने अनेकवेळा गौण खनिज उत्खननाचे परवाने काढून बेकायदेशीर बेसुमार उत्खनन केले आहे. यासाठी हवेली तहसीलदार व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कागदपत्रांची कसलीही पडताळणी न करता दुसऱ्याच्या जमीनीवर, तिसऱ्यालाच परवाना दिल्याचे किरकटवाडी गावचे माजी उपसरपंच हरिष मंडले व इतर जमीनधारकांनी महामीडिया वॉच न्यूजशी बोलताना सांगितले.
त्यामुळे खनिकर्म विभाग आणि तहसिलदार यांच्या कार्यपद्धती विषयी संशयाचे धुके निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील खनिकर्म अधिकारी पाटील यांनी तहसीलदार यांच्या संगनमताने नांदोशी गावामधील गट नंबर 4 मधील इतर डोंगराळ जागेत वनीकरण क्षेत्रातील जागेवर 2017 साली बंद केलेल्या खाणी पूर्ववत बेकायदेशीर रित्या सुरू केल्या आहेत. यामध्ये या जागेतील नंदकुमार कुलकर्णी, बाळासाहेब जाधव, मिलिंद किवळे, पोपट रानवडे या खानपट्टा धारकांचे परवाने कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय आयुक्तांनी दिले असताना, त्या आदेशाचे उल्लंघन करून खनिकर्म अधिकारी पाटील व तहसीलदार यांनी सदर बंद खानपट्टा पुन्हा बेकायदेशीर रित्या दिल्याने, महसूल खात्यात किती भ्रष्टाचार बोकाळलेला आहे यांची कल्पनाच केलेली बरी!
नांदोशी, सणसवाडी, धायरी या गावातील डोंगराळ भाग, पीएमारडीएच्या नकाशामध्ये वनीकरण क्षेत्र म्हणून अधिसूचित केला असताना, या भागात गेल्या दशक भरात अतोनात, बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन झाले आहे. तसेच या सर्व खानपट्टा धारकांना ग्रामपंचायत व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची देखील परवानगी घेतली नाही. तरी देखील हे खानपट्ट कसे मंजूर होतात याच3 गौडबंगाल फक्त खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांनाच माहीत असावे.
याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी त्वरित कडक कारवाई करून जिल्हा खनिकर्म अधिकारी पाटील व तहसीलदार निकम यांना तात्काळ निलंबित करून, खानपट्टा रद्द करून, नांदोशी ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
