पुणे: शहरातील कर्वेनगर ( हिंगणे बुद्रुक ) येथील सर्व्ह नंबर 16, 19, 51, 53 भाग, हा एकूण 38 एकर 25 गुंठे इतका शासकीय भूखंड, कोपरे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव होता. त्यातील केवळ 52277 चौरस मीटर अर्थात अंदाजे 13 एकर जमीन क्षेत्र विकसित करण्यासाठी , 2001 व 2002 साली बिल्डर सुर्यकांत काकडे यांना प्रकल्पग्रस्तांनी दिले होते. मात्र काकडे यांनी शासनाची व प्रकल्पग्रस्तांची परवानगी न घेता नोंदणी दस्तामध्ये खाडाखोड करून 13 एकर ऐवजी संपूर्ण 38 एकर 25 गुंठे जमीन फक्त 100 रुपये स्टॅम्पवर दस्तनोंदणी करून घेतली.
या विकसन करारनामा, कुलमुखत्यारपत्र आदींच्या दुरुस्ती दस्तनोंदणी मध्ये काकडे यांनी कुठलेही सर्व्हे नंबर, सिटी सर्व्हे नंबर, अथवा भूखंड क्रमांक नमूद केला नाही. सर्वात मोठा हलगर्जीपणा कळस म्हणजे जागेचे सातबारा, फेरफार, व इतर कागदपत्रे जोडलेली नाहीत. हा आणखी मोठा गुन्हा झाला आहे.
एकतर ही शासनाची व प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक काकडे यांनी केलीच, हा फौजदारी गुन्हा आहे, तसेच या वाढीव सुमारे 18 एकर जमिनीचे नोंदणी व मुद्रांक शुल्क, जे की 50 कोटींपेक्षा अधिक होते, ते बुडवले आहे. ते नोंदणी विभागाने दंडासाहित वसूल करावे या मागणीसाठी छावा क्रांतीवीर संघटनेचे मुख्य संघटक दिनकर कोतकर व कार्यकर्त्यांनी विभागाला तक्रार अर्ज देऊन 2 महिन्यापूर्वी आंदोलन देखील केले होते. मात्र अजूनही काकडे यांच्या कंपनी वॉर दंडात्मक कारवाई झालेली नाही.
सन 2001 व 2002 साली झालेल्या या भ्रष्टाचार प्रकरणी कोणत्याही नोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागाने कारवाई केली नाही, याउलट या भ्रष्ट व्यवहाराकडे दुर्लक्ष केले. मागील महिन्यात हंगामी मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी काकडे बिल्डर्स यांना नोटीस पाठवून विचारणा केली मात्र त्यास साधे उत्तर देण्याचे सौजन्य काकडे बिल्डर्सनी दाखवले नाही, ही शोकांतिका आहे. याबाबत काल अधिक माहितीसाठी विचारणा केली असता, मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी, वादग्रस्त दस्तनोंदणी नंतर 10 वर्षाच्या आत शुल्कवासुली करता येते असा नोंदणी नियम असल्याचे सांगून याविषयावर पडदा टाकला .
मात्र काकडे बिल्डर्स यांच्या कडून कोट्यवधींची शुल्कवसुली करू नये असा आदेश वरून आला असल्याचे स्पष्ट होत आहे. नोंदणी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणल्याची कुजबुज विभागामध्ये सुरू आहे.
या वादग्रस्त प्रकल्पातील बनावट दस्तनोंदणी आधारावर सर्व जागेवरच बोगस महानगरपालिका बांधकाम प्लॅन पास करून लाखो चौरस फूट बांधकाम विकून ग्राहकांची, बँका, प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक झाली आहे. या प्रकल्पात काकडे प्लाझा, काकडे सिटी, काकडे प्लाझा, डी मार्ट, क्रोमा यासारखे मोठे प्रकल्प उभे राहिलेत, यामधून सुमारे 5000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप दिनकर कोतकर यांनी केला आहे.
यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून त्यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
