
खटाव, दि. १० ऑक्टोबर २०२६ : खटाव व पंचक्रोशीतील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुम्मा मस्जिद मंगळवार पेठ व मुल्ला मोहल्ला मस्जिद ट्रस्टचे कार्य संपूर्ण राज्यातील इतर संस्थांसाठी अनुकरणीय ठरले आहे, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले. संस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीला अधिकृत मान्यता मिळाल्याने ती नव्या जोमाने कार्यरत होऊन संस्थेची प्रलंबित कामे पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. जमीर काझी, उपाध्यक्ष रसूल मुल्ला, सचिव दिलावर शिकलगार, खजिनदार मुसा काझी तसेच विश्वस्त मन्सूर काझी, शकील मणेर, अब्दुलकदिर झारी, रियाज शेख आणि शहाबाज मुल्ला यांचा जलमंदिर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी संस्थेच्या एकूण कामकाजाचा आढावा घेत समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शन व पाठबळामुळेच तीन स्वतंत्र पॅनलमध्ये झालेल्या निवडीत संस्थेच्या कामकाजाशी प्रामाणिकपणे जोडलेल्या सदस्यांच्या समितीला अधिकृत मान्यता मिळाली, वक्फ मंडळ तसेच महाराष्ट्र सरकारने तसे आदेश जारी केले आहेत.
संस्थेचे कामकाज आणि सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. संस्थेला राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र मिळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, राज्यातील अन्य संस्थांनीही खटावच्या या संस्थेचा आदर्श घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
“संस्थेचा कारभार आदर्श ठरण्यासाठी पारदर्शकता, संपूर्ण लेखापरीक्षण, मालमत्तांचे संरक्षण आणि सामान्य सदस्यांसह जनतेच्या हिताचे निर्णय महत्त्वाचे असतात. खटाव येथील जुम्मा मस्जिद मंगळवार पेठ व मुल्ला मोहल्ला मस्जिद ट्रस्टने ही उद्दिष्टे समोर ठेवून काम केले आहे. आता नवनिर्वाचित समिती उर्वरित कामे पूर्ण करून संस्थेला अधिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. संस्थेच्या विकासासाठी माझ्याकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
यावेळी संस्थेच्या आदर्श कार्यात मोलाचे योगदान दिलेले दिवंगत चेअरमन शमशुद्दीन मुल्ला यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त सहयोगी सदस्य जब्बार मुल्ला, रियाज शिकलगार, सलीम काझी, निसार मुल्ला तसेच डॉ. अमीन काझी यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी पंकज चव्हाण, मनोज देशमुख आणि संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. राजेंद्र गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्यामुळे नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीला नवी प्रेरणा मिळाली असून, संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि समाजहिताभिमुख करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
