
पुणे: उत्तमनगर उपबाजार समितीच्या व्यापारी संकुलातील तब्बल 54 गाळे हे विना निविदा प्रक्रिया राबवता मर्जीतील व्यापाऱ्यांना दिल्याचा आरोप पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर यांनी केला आहे. त्याचबरोबर पुणे बाजार समितीच्या अखत्यारीतील सर्व उपबाजार, मुख्य बाजार येथील अनेक निविदा मध्ये घोळ करून भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी महामीडिया वॉच न्यूजशी बोलताना सांगितले.
यासंदर्भात काळभोर यांनी पणन संचालकांना तक्रार केली असून त्यावर चौकशी समिती नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही बाजार समितीमधील भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काहीवेळा प्रशासक नेमण्याव्यतिरिक्त फारशी काही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
सर्वसामान्य शेतकरी, नागरिक, ग्राहक, व व्यापारी यांच्या कष्टातून मिळणारा निधी अशा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विशिष्ट लोकपर्यंत पोचतो आणि दरवेळी आरोप होऊन, चौकशी करून नंतर सर्वकाही विसरून, सुरळीतपणे पुन्हा सुरू होते, हे थांबण्याची गरज आहे.
