मावळमधील 16 कोटींच्या दस्तनोंदणी घोटाळ्यातील आरोपी दुय्यम निबंधक अजूनही मोकाट!
2022 पासून पुणे ग्रामीण मुद्रांक जिल्हाधिकारी प्रविण देशपांडे मूग गिळून गप्प, वडगाव मावळमध्ये गुन्हा दाखल होऊनही पोलिस सुस्त!!
पुणे:- मावळ तालुक्यातील पाळे गावातील सर्व्हे नंबर 14/7 या जमिनीच्या कुलमुखत्यारपत्राच्या दस्तनोंदणी क्र. 6014/2022, मध्ये 16 कोटी 25 लाख रुपयांचे मुद्रांक नोंदणी शुल्क वसूल न करता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक निता शिराळ व इतरांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा (रजिस्टर क्र. 215/2022 ) दाखल झाला.
मात्र त्यापुढे या प्रकरणी तपासाचे गाडे काही पुढे सरकलेच नाही. पुणे ग्रामीण मुद्रांक जिल्हाधिकारी प्रविण देशपांडे व इतर वरिष्ठ अधिकारी हे आरोपी दुय्यम निबंधक निता शिराळ यांच्या कोट्यवधी च्या गुन्ह्यावर पांघरून का घालत आहेत, हे अनाकलनीय आहे.
एरवी पोलिस साध्या गुन्ह्यात देखील सामान्य नागरिकांना केवळ संशयाच्या बळावर अटक करतात, मात्र शासकीय तिजोरी वर 16 कोटी 25 लाख रुपयांचा डल्ला मारणाऱ्या दुय्यम निबंधक व इतरांना मोकाट सोडले आहे असे दिसते. वडगाव मावळ पोलिसांनी 2022 मधील गुन्ह्यावर, सप्टेंबर 2025 मध्ये माहिती दिली आहे की याप्रकरणी अजून तपास सुरूच आहे, अजून कोणालाही अटक केली नाही.
या सर्वाचा अर्थ न कळण्याइतके जनता दुधखुळी नक्कीच नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार अजूनही 16 कोटींची वसुली झालीच नाही, केवळ तो वादग्रस्त दस्त रद्दबातल ठरवला आहे, आणि दुय्यम निबंधक यांची बदली केली आहे.
सध्या गेल्या काही महिन्यांपासून महसूल खात्यातील कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस येत असून केवळ आम जनता व मिडिया ला दाखवण्यासाठी थातुरमातुर कारवाईचे नाटक केले जाते, मात्र चार दिवसांनी लोक हे घोटाळे विसरले की कारवाई थंड पडते.
ज्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला त्यावर कारवाई न करता, मिळालेल्या लुटीचे पदानुसार वाटप होऊन सारे गप्प राहतात. शासनाची तिजोरी मात्र अशा दरोडेखोरांमुळे रिकामीच राहते.
तरी मावळ दस्तनोंदणी घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकारी केवळ निलंबित न करता कोट्यवधी रुपयांची वसुली त्यांच्या बँक व मालमत्तेतून करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व ऍड ज्ञानेश्वर कराळे यांनी केली आहे.