चिंचवड नगर भूमापन कार्यालयातील भूकर मापक नोव्हेंबरमध्ये पोक्सो गुन्ह्यात अटक, घटना गोपनीय राखली, निलंबित करूनदेखील गडहिंग्लजमध्ये संलग्न बदली!!
भूमी अभिलेख खात्याचा अजब कारभार, गुन्हेगाराला पगार सुरू रहावा यासाठी प्रयत्न!
पिंपरी चिंचवड नगर भूमापन कार्यालयात भूकर मापक म्हणून कार्यरत रोहिदास लूमाजी रावते यास 20 नोव्हेंबर 2025 रोजी पोक्सो कायद्याच्या गुन्ह्यात सांगवी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने रावते याना न्यायालयीन कोठडी सुनावली, त्या केसची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी आहे.
दरम्यानच्या काळात भूमी अभिलेख पुणे प्रदेश उपसंचालक यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियम 1971 अन्वये निलंबित केले, मात्र निलंबन काळात रावते याची भूमी अभिलेख कार्यालय, गडहिंग्लज येथे निमतानदार 1 या पदावर संलग्न बदली केली जेणेकरून त्याचा पगार सुरू व्हावा.
नागरी सेवा कायद्याच्या कक्षेत या गोष्टी बसतात का, हा प्रश्नच आहे. मात्र यानिमित्ताने भूमी अभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांचे गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांचे दर्शन होत आहे. तसेच लहान मुलीवर बलात्कार करण्याइतपत मजल मारणारा रोहिदास रावते याची नोकरी टिकवण्यासाठी खात्यांतर्गत कडक कारवाई न करता केवळ बदली करण्यात येते हे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे.
यापूर्वी भूमी अभिलेख खात्यातील हवेली व जिल्हा कार्यालयात सूर्यकांत मोरे, अमरसिंह पाटील यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुढे काय झाले, हेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.