अज्ञात भूत!! वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात चक्क भुताने केली वादग्रस्त दस्तांची अदलाबदल, पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल!!
दुय्यम निबंधक निता शिराळ यांनी शासनाची 16 कोटींची फसवणूक करून स्वतःच नोंदवला अज्ञाताविरुद्ध गुन्हा!!
पुणे : महसूल प्रशासनात भ्रष्टाचार लपवण्यासाठी आता आधार घेतलाय, चक्क एक अज्ञात भुताचा!! वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात या अज्ञात भुताने दिवसा ढवळ्या, अधिकारी निता शिराळ, व इतर सर्व कर्मचारी कामात उपस्थित व व्यग्र असताना, त्या सर्वांसमोर वादग्रस्त दस्त फाईल मधून बाहेर काढून त्यातील भुताला नको असलेली 23 पाने फाडून, नवी 23 पाने टाइप करून जोडली आणि ते भूत सर्वांसमोर फरार झाले… आहे की नाही गंमत!!
वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी निता शिराळ यांनी 2022 मध्ये कुलमुखत्यार दस्तांची नोंदणी करताना 16 कोटींचा शासकीय महसूल बुडवल्याचे समोर आल्यावर, आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी निता शिराळ यांनी स्वतःच वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 15/11/2022 रोजी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या वादग्रस्त दस्तनोंदणी मध्ये मूळ कुलमुखत्यार पत्र मधील 23 पाने फाडून नवीन 23 पाने जोडून तो दस्त खरेदी खतामध्ये बदलण्यात आला. हा पहिला गंभीर गुन्हा! त्यानंतर त्या नवीन खरेदी खताची दस्तनोंदणी केल्यावर त्याचे नोंदणो व मुद्रांक शुल्क 16 कोटी 25 लाख रुपये न भरता केवळ 500 रुपये भरून निबंधक अधिकारी निता शिराळ यांनी नोंदवला.
त्यामुळे शासनाचे 16 कोटी 25 लाखाचे नुकसान झाले. हा दुसरा गंभीर गुन्हा शिराळ यांनी केला असताना, हा प्रकार उघडकीस आल्यावर स्वतःची कातडी बचाव करण्यासाठी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे हास्यास्पद आहे. तो अज्ञात चोर आणि तक्रारदार हे दोन्ही एकच व्यक्ती असल्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.
याप्रकरणी पुणे ग्रामीण मुद्रांक जिल्हाधिकारी प्रविण देशपांडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निता शिराळ यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याकडे सोयीस्कर डोळेझाक करून जनतेची व शासनाची दिशाभूल केली आहे.
वडगाव मावळ पोलिसांनी या नाटकीय गुन्ह्यात शिराळ यांची यथोचित साथ देऊन आपले कर्तव्य पार पाडत अज्ञात भुताविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, आज 3 वर्षे होऊनसुद्धा पोलिसांना अज्ञात भूत सापडले नसून केवळ तपास सुरू असल्याची बतावणी करतात.
तरी वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत वादग्रस्त दत्तमध्ये 23 पानांची अदलाबदली करणारे भ्रष्टाचारी अज्ञात भूत कोणाला दिसल्यास, सापडल्यास त्याची माहिती त्वरित वडगाव मावळ पोलिस ठाण्यात कळवावे, तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी प्रविण देशपांडे आणि दुय्यम निबंधक निता शिराळ यांना त्वरित कळवावे.
जो कोणी या भ्रष्टाचारी अज्ञात भुतास पकडून देईल त्यास 16 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल हो!!