भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनसाठी नवीन जागा नाहीच, सरहद चौकातील जागा फक्त सातबाऱ्यावर
कात्रज मंडल अधिकाऱ्यांनी नवीन जागेसाठी पाठवला प्रस्ताव

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, मेट्रोच्या कामामुळे नवीन जागेत स्थानांतरित करावे लागणार असून नवीन जागेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल खात्याकडे मागणी केली होती. त्यानुसार सरहद चौकात जागा शोधण्याचे काम सुरू होते.
कात्रज मंडल अधिकारी व तलाठी यांना सरहद चौकात जागा सातबाऱ्यावर दिसते मात्र प्रत्यक्षात काही जागा डीपी रस्त्यात गेली असून उरलेल्या जागेचे वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सरहद चौकापासून काही अंतरावर , साई सयाजी शेजारी, सर्व्ह नंबर 79/80 मधील 15 गुंठे जागा शोधली असून त्यामध्ये कात्रज मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयाची कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यामध्ये पोलिस स्टेशनसाठी देखील काही जागा, मजले द्यावे, असा नवीन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आला आहे.
मात्र ही जागा संपादित होऊन, त्याठिकाणी सुसज्ज इमारत बांधण्यास काही वर्षांचा कालावधी लागू शकतो, तोवर मेट्रोचे काम सुरू होऊन सध्याच्या पोलिस ठाण्याचे इतर ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता नेमके कुठे स्थलांतर होणार याबाबत मोठा गंभीर प्रश्नच निर्माण झाला आहे.